व्यासपीठ


फार पुरातन काळापासून मानवी जीवनाचा प्रवास धार्मिकतेच्या नौकेतून चाललेला आहे. संपूर्ण जीवनच त्यावेळी धार्मिकतेने व्यापलेले होते, आताही ब-याच प्रमाणात ते व्यापलेले आहे हे सर्वांनाच दिसते. धार्मिक पुराणिक कथा सांगणे, धार्मिक पुराणिक विषयावर नाटके करणे, धार्मिक पुराणिक विषयावर काव्य करणे हे त्यावेळी सहजतेने घडे व त्यातच समाजाला रुची असे. त्यातल्या त्यात सोयीचा व जनरुचीचा प्रकार कथा सांगणे हा होता. कुठेल्यातरी देवळात अशा कथा सांगणारे पुराणिक येत. त्याची माहिती लोकांना हस्तेपरहस्ते कळे. मग संध्याकाळी त्यांचा कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेलाच असायचा. या कीर्तनासाठी नंतर कुठल्याही जाहिरातीची आवश्यकता नसायची कि आमंत्रणही आवश्यकता नसायची. पुराणिकबुवांसाठी एक तक्तपोस देवळात ठेवलेला असायचा. कीर्तन सुरू होण्यापूर्वी देवाची पुजा केली जायची मग पुराणिकाचाही हार घालून सत्कार केला जायचा. मगच कीर्तनाला सुरुवात केली जायची. श्रोत्यांचे ३-४ तास मग आनंदात जात. मनोरंजनाबरोबर ज्ञानाचीही लयलूट या कार्यक्रम होत असे.

कालांतराने गर्दी वाढायला लागली. देवळातली जागा अपुरी पडायला लागली. टाळकरी, पेटीवाला, तब्बलजी, पुरोहित यांचेसाठी गर्दीमुळे जागा उरेनाशी झाली. त्यासाठी मंदिराबाहेर मंडप उभारण्यात येऊन पुराणिकांसाठी ३ ते ४ फुट उंचीचा तात्पुरता तक्तपोस तयार करण्यात यायचा. हा तक्तपोस श्रोतावर्गापासून थोडा दूर असायचा. संस्कृतमध्ये व्यासः म्हणजे वेगळी केलेली जागा तर पीठं म्हणजे पुरोहिताची बसण्याची जागा. यामुळे पुर्वी देवळातील कीर्तनाच्या वेळी पुराणिक बसण्याच्या तक्तपोसाला व्यासपीठ म्हटल्या जात. आताही अशा उभारलेल्या कायम स्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या तक्तपोसाला व्यासपीठच संबोधण्यात येते. पण आता या व्यासपीठाचा वापर विविध कारणांसाठी करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आता व्यासपीठाची व्याख्या सर्वसाधारणपणे विचार मांडण्याची किंवा कलाकृती सादर करण्याची एक निश्चित जागा अशी केली जाऊ शकते.

व्यासपीठ या शब्दाची व्युत्त्पति मुळ संस्कृत शब्दापासून झालेली आढळते. त्यावेळी त्या शब्दाचा अर्थ वेगळा होता आणि आता बदलत्या वापरामुळे त्याच्या अर्थाची वाढलेली व्याप्ती यामुळे त्याचे बदललेले स्वरूप लक्षवेधक नक्कीच आहे.