मराठी भाषा वाचतांना भाषेच्या शब्द-डोहात बुडी मारण्याचा एक छंद लागला आहे. अर्थात हे मी असे नेहमीच करतो असे नाही. पण ज्यावेळी करतो त्यावेळी नेहमीच जे हाताला लागते त्याने मन आश्चर्य चकित होते. साधारण एक आठवड्यापुर्वी आंघोळ झाल्यावर बनियान लवकर सापडले नव्हते. झालं हा शब्द चांगलाच डोक्यात बसला. मग झाली शोध यात्रेला सुरुवात. हा शब्द इंग्रजी, हिंदी, संस्कृत,मराठी यातुन निर्माण झाला असावा असा कयास होता. यांतही इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत यापैकी कुठल्या तरी शब्दांचा संकर असावा असे वाटत होते. यामुळे इंग्रजी-मराठी शब्दकोश, मराठी-इंग्रजी शब्दकोश, संस्कृत- मराठी शब्दकोश, मराठी-मराठी शब्दकोश, इंग्रजी-इंग्रजी शब्दकोश, हिंदी- मराठी शब्दकोश तसेच हाताला लागतील तेवढी पुस्तके यांची खंगाळणी केली. यातुन जी माहिती प्राप्त झाली. ती उद्बोधक होती. त्यातुन या शब्दामागे बनिया हा शब्द असल्याचे लक्षात आले. (बनिया हा शब्द हिंदी/बंगाली आहे व तो संस्कृत शब्द वाणिज्य या शब्दावरून आला आहे.) बनिया लोक अंगात जी सुती बंडी (बंडी हा देखिल संस्कृत मधून आला आहे.) घालत त्यावरून इंग्रजांनी त्याचे इंग्रजीकरण करून बनियान हा नविन शब्द निर्माण केला.   गुजराथी व्यापारी पुर्वी वडाच्या झाडाखाली मंदिर बांधत. वडाच्या झाडाला इंग्रजीत Baniyan tree म्हणतात. यावरून हे लक्षात येते कि, बनिया या हिंदी/बंगाली शब्दातून बनियान असे इंग्रजीकरण केले गेले आहे. पुर्वी बनियान याला समांतर गंजिफ्राॅक हा शब्द ही वापरला जायचा. आता तो सहसा वापरला जात नाही. हा शब्द गाॅज (gauze) या इंग्रजी शब्दावरून घेतला व  त्याचे मराठीकरण गंजिफ्राॅक (सच्छिद्र पातळ कापडाचा फ्राॅक) असे केले गेले.  म्हणजेच बनियान हा शब्द हिंदी/ बंगालीतून, इंग्रजीत तर गंजिफ्राॅक हा शब्द इंग्रजीतून, मराठीत आला. अशी आहे ही शब्दांची हेराफेरी.