"श्री"
"श्रीगजानन विजय ग्र॔थ पारायण" -- 🪷 होणारा बोध आणि लागणारा वेळ, .. एक आत्मचिंतन! 🪷
श्रीगजानन महाराज की जय ! 
🙏 जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी इ.स. १८७८ ते इ.स.१९१० या बत्तीस वर्षांच्या काळात, आपल्या अवतारकार्यात श्रीक्षेत्र शेगांव येथे जे लीला कार्य केलं, त्या लीलांचा परिचय, त्या अवतार कार्याचा परिचय, समस्तांना व्हावा, असं शेगांवच्या मंडळींना वाटलं आणि त्यातून रामचंद्र पाटीलांनी पंढरपूर क्षेत्री जाऊन ह.भ.प. संत कवी श्री दासगणू महाराजांना त्या संदर्भात विनंती केली. पुढे दासगणू महाराज शेगांव येथे ग्र॔थ लिखाणाच्या निमित्ताने आलेत आणि गजानन महाराजांचा परिचय जन सामान्यांना करून देणारा ग्र॔थ, अर्थात, श्रीगजानन विजय ग्र॔थ अस्तित्वात आला. दासगणूंच्या हातून या दैवी ग्र॔थाची निर्मिती अर्थातच श्रीगजानन महाराजांच्या आशिर्वादानेच झाली. 
अत्यंत रसाळ, प्रासादिक आणि ओघवती भाषा, हे गजानन विजय ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या रसाळतेत गोडी असल्यामुळे प्रत्येक वाचनाच्या वेळी, ' नित्य नूतन रुप तुझे ' असा अनुभव येतो. विविध अंगांनी "श्रीगजानन विजय ग्र॔थ अभ्यासणे" संभव होऊ शकेल असं लक्षात येतं. 
दासगणूंची लेखन शैली, भाषेची रसाळता, अध्यात्मिक अंग,लिखाणातील शिस्त, महाराजांची शिकवण, तत्त्वज्ञान, एखाद्या प्रबंध लेखनात असावी अशी शिस्त व मांडणी, विषय मांडणीचा क्रम, त्यातील उपमा, अलंकार, विविध उदाहरणे, पुराणातील संदर्भ व दाखले, ईशस्तवन, भगवंताकडे केलेले मागणे, भक्तीत कमी पडतो म्हणून व्यक्त होणारी खंत, ग्र॔थाची एकूण व्यापकता, ऐहिक कारणास्तव उपयुक्त वर्णन, इत्यादी इत्यादी अनेक पैलू सांगता येतील. 
परंतू या सर्व गोष्टींवर विचार केला की आपलं अंतर्मन विचारतं हे तुला पचनी पडलं आहे का? उत्तर येतं, ' नाही!' मग त्या साठी तुला काय करावं लागेल? 'तुला ग्र॔थावर चिंतन, मनन करावं लागेल.' ' तुला ग्र॔थ वाचनासाठी वेळ द्यावा लागेल'. 
ग्र॔थ वाचनासाठी वेळ द्यावा लागेल म्हटल्यावर, ग्र॔थ वाचनासाठी लागणारा वेळ याच विचारावर मनात वैचारिक आंदोलन सुरू झालं आणि मन विचार करू लागलं की श्रीगजानन विजय ग्र॔थ वाचनास किती वेळ लागावा? त्यातून जाणवलं की याही अंगाने विचार करून पाहिला काय हरकत आहे? त्यातून मनात जे विचार उद्भवले तेच हे आत्मचिंतन! कदाचित बरोबर, कदाचित अपूर्ण. पण निदान याही अंगाने होणारा एक विचार श्रीगजानन विजय वाचकांसमोर मांडून पहावा याच भावनेतून हा खटाटोप. .. 
एखाद्या पोथीचं वारंवार वाचन म्हणजे पारायण! हे पारायण करीत असताना, प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक ओवीचं व्यवस्थित उच्चारण होणं गरजेचं आहे. अर्थात हे मनातल्यामनात होईल अथवा थोडं मोठ्यानं होईल. मोठ्याने उच्चार करून पारायण केल्यास जास्त वेळ लागतो, तुलनेत मनात वाचन केल्यास कमी वेळ लागतो. मात्र मनात वाचन केल्यास मन इतरत्र भरकटत जातं, त्याला पुन्हा जागेवर आणावं लागतं. तुलनेत मोठ्याने वाचन करताना ही शक्यता कमी असते. 
श्रीगजानन विजय ग्र॔थ वाचण्यासाठी, अर्थात एका संपूर्ण पारायणासाठी किती वेळ लागावा?
 एक विचार.. 
 ओव्यांच्या संख्येप्रमाणे लागणारा वेळ 
श्रीगजानन विजय ग्रंथात एकूण तीन हजार सहाशे एकोणसत्तर ओव्या आहेत. मनात विचार आला एका ओवीला किती वेळ लागेल. उदाहरणार्थ एक ओवी घेतली. " सांग करून वारीला | पुंडलिक गेला मुंडगावाला | हे जो चरित्र वाची भला | त्याचे टळेल गंडांतर | " ही ओवी वारंवार म्हणून पाहिली. अन्यही ओव्या म्हणून पाहिल्यात. असं लक्षात आलं की चार सेकंद एका ओवीला लागतात. जर त्यात कठीण शब्द असतील तर एखाद सेकंद जास्तही लागू शकेल. 
३६६९ × ४= १४,६७६ सेकंद. ला साठ ने भाग दिला तर २४४.६ मिनीटे समजू २४५ मिनिटे. म्हणजे स्थूल मानाने चार तास झालेत. यात शेवटचं वंदन, अन्य विचार, पान उलटण्यातील वेळ, बाकी अडचणी, अडथळे, याचा विचार केला नाही तरीही किमान चार तास मला पारायणासाठी लागणार. शिवाय कुणीही व्यक्ती सलग इतका वेळ मन केंद्रित करू शकत नाही, हे मानसशास्त्रीय सत्य आहे. 
प्रत्येक ओवीचा विचार न करता, वेगाने वाचून पाच मिनिटात किती ओव्या होतात असा विचार केला तेव्हा अनेकदा हा प्रयोग करून पाच मिनिटात पंच्याहत्तर ओव्या होतात असं लक्षात आलं. म्हणजे हिशेब पुन्हा तिथेच आला. पाच मिनिटात एकूण तीनशे सेकंद आलेत पंच्याहत्तर ओव्यांना प्रती ओवी चार सेकंद म्हटलं की तीनशे सेकंद अर्थात पाच मिनिटे हिशेब आला. 
अध्यायांनुसार विचार. 
ओवीला चार सेकंद म्हटले, किंवा ७५ ओव्यांसाठी ५ मिनीटं लागलीत . आपण एकूण एकवीस अध्यायांचं वर्गीकरण केलं तर, १६ अध्याय सरासरी १५० ओव्यांचे आहेत, तर अध्याय क्रमांक ११,१८ व २० सरासरी २०० ओव्यांचे आहेत. तर अध्याय क्रमांक १९ .. ३४९ ओव्या आहेत आणि अध्याय क्रमांक २१ मधे २५३ ओव्या आहेत. 
स्थूल मानाने विचार केला तर. १६ अध्याय प्रत्येकी १० मिनिटं म्हणजे १६० मिनिटं. ३ अध्याय प्रत्येकी १५ मिनिटं म्हणजे ४५ मिनिटं. व दोन अध्याय सरासरी २० मिनिटं धरल्यास एकूण २४५ मिनिटं ,म्हणजेच किमान चार तास. 
याचाच अर्थ मी मी पूर्ण गजानन विजय ग्रंथ एका बैठकीत वाचतो म्हटलं तर मला किमान चार तास त्या साठी देणं आलं. परंतू जिथे मानवी कृतीचा संबंध येतो तिथे केवळ तांत्रिक विचार करून कसं चालेल? तिथे मनाचा विचार करावाच लागेल. दासगणू महाराजांनी म्हटलच आहे. ' मन सदा आशाळभूत ते न कदा स्थिर होत ' मानवी मन म्हटलं की पुढील विचार करणं क्रम प्राप्तच आहे 
 -- आपल्या मानसिकतेत सतत बदल होत असतो 
 -- मन भरकटत जातं 
 -- मनात वेगळे विचार सुरू झालेत की वाचनाची गती मंदावते 
 -- एकाच शारिरीक स्थितीत आपण जास्त वेळ बसू शकत नाही 
 -- शरीर थकलं की मनही थकतं, त्यामुळे सुरवातीची गती पुढे राहत नाही 
 -- कधी मनात भावनांचा उद्रेक होतो. मन लावून वाचलं तर डोळे भरून येतात. 
याचाच अर्थ प्रत्येक ओवीचा व्यवस्थित उच्चार करून मनापासून पोथी वाचतो म्हटलं तर, मला किमान साडे चार तास त्या साठी देणं गरजेचं ठरतं. तसा वेळ देऊन पारायण केलं तरच आणि सातत्याने गजानन विजय ग्रंथाचं चिंतन मनन केलं तरच मला थोडंफार काही समजू शकेल. 
 शेवटी एक मुद्दा असा येतो की, आपण पारायण का करतो? या मागे अनेक उद्देश असू शकतात. त्यापैकी काही सांगायचे झाल्यास..
 जिज्ञासा म्हणून पोथी वाचन. बाकी 
 १. महाराज जाणून घेण्यासाठी, महाराजांची ओळख व्हावी म्हणून. २. महाराजांचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी . ३. काही उद्देश मनात धरून, अमुक काही प्राप्त व्हावं म्हणून. ४. महाराजांची शिकवण आचरणात आणता यावी म्हणून. ५. महाराजांच्या अनुसंधानात राहण्यासाठी. ६. महाराजांचा परिचय अन्य भक्तांना करून देता यावा म्हणून. ७. पोथी पाठ व्हावी म्हणून. ( सुरूवातीला नाही पण पुढे हा दृष्टिकोनही असू शकेल)८. पोथी वाचता वाचता स्वतःला प्रगत करून प्रसंगी प्रवचन करू शकू, पोथीवर भाष्य करू शकू म्हणून. ९. साहित्याचा अभ्यास म्हणून. १०. स्वतःची ओळख व्हावी म्हणून. 
या आत्मचिंतनातून एक जाणवलं की, पारायणांची संख्या वाढता वाढता आत्मपरिचय होऊ शकला तरच हे सर्व सार्थकी लागणार आहे. दासगणू महाराजांनी पोथीत म्हणून ठेवलं आहेच, ' नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी रे श्रीपती. ' मग अशी जर माझी स्थिती आहे तर मी काय करायला हवं? की जेणेकरून निदान काही प्रमाणात का होईना पोथीतून काही ज्ञान मिळू शकेल. मन थोडं भक्ती मार्गाकडे वळू शकेल यावर अंतर्मनातून उत्तर येतं, श्रीगजानन विजय मन लावून वाच. त्यावर चिंतन मनन कर. नीट समजावून घे. ज्ञान, भक्ती वगैरे महाराजांवर सोडून दे आणि मुख्य म्हणजे अनन्यतेने महाराजांना शरण जाऊन, त्यांचं अधिष्ठान ठेवून पोथी वाच तुझं जीवन सार्थकी लागेल. 
यावर मग मनापासून महाराजांना एक प्रार्थना केल्या जाते. ' महाराज या पारायणासाठी किती वेळ लागावा ते तुम्ही ठरवा. रोज एक दुर्वांकुर वाहून घ्या, दशमी, एकादशी द्वादशी ला पारायण होऊ द्या, कदाचित तो गुरूपुष्यामृत योग असू द्या. अथवा ते एकासनी पारायण असू द्या. जसे होईल तसे पारायण होऊ द्या पण कळकळीची प्रार्थना आहे. त्यातील तत्वज्ञान आमच्या मनात झिरपू द्या आणि मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका या तुमच्या वचनांची व्याप्ती आम्हाला समजू द्या. 
यावर मग महाराज हसल्याचा भास होतो, अन् वाटतं महाराज जणू म्हणताहेत अरे पारायणाच्या वेळेचं काय घेऊन बसलास? जन्मो जन्मीचा वेळ द्यावा तेव्हा पुण्य संचय होतो. संतांनी म्हटलं आहेच नं ' जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा मनापासून भक्ती करा,उभं आयुष्य उभा वेळ सद्गुरूंच्या चिंतनात व्यतीत करा. 
खर आहे असं झालं तरच आम्ही महाराजांना विसरणार नाही, असं झालं तरच आपल्या भक्तीत अंतर होणार नाही आणि असं झालं तरच महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत राहील. 
तेव्हा.. महाराजांचं चिंतन करून म्हणू या.. समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज की जय! 
 जयंत वेलणकर, 9422108069