घमेंडखोर मासे

घमेंडखोर मासे

संकट येण्याआधीच सावधपणे त्यापासून बचाव करण्याची तयारी करणारा आणि संकट येताच सिद्ध राहून त्याच्यावर मात करू शकणारा...या दोघांना सूख मिळतं आणि त्यांचा विकास होतो. जे नशिबात असेल तेच होईल असा विचार करणारे दैववादी नष्ट होतात. एका तलावात विधाता, सिद्ध आणि दैववादी अशा नावांचे तीन मासे रहात होते. एके दिवशी काही कोळ्यांनी तो तलाव पाहिला, आणि त्यात खूप मासे आहेत हे पाहुन ते म्हणाले “उद्या आपण इथे मासेमारीसाठी येऊ!” हे ऐकून विधाताने सगळ्या माशांना बोलावलं आणि म्हणाला “त्या कोळ्यांचं बोलणं ऐकलंत? जिवंत राहायचं असेल तर आज रात्रीच आपल्याला जवळच्या दुसऱ्या तलावात जावं लागेल!’ विधाताचं म्हणणं ऐकून इतर मासे म्हणाले “आपलं घर सोडून आम्ही इतर कुठे नव्या जागेत जाऊ शकत नाही!” यावर सिद्ध म्हणाला “नव्या जागेत काही नव्याच अडचणी येऊ शकतात. आपण इथेच राहून कोळ्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न करायला हवा!” दैववादी म्हणाला “जे नशिबात असेल ते होणारच. उगाच काहीही प्रयत्न करण्यात अर्थ नाही!” विधाता त्याच्या कुटुंबाला घेऊन रात्रीच दुसऱ्या तलावात गेला. दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी जाळं टाकलं. त्यात सिद्ध आणि दैववादीसह इतर मासे अडकले. सिद्धाने जाळ्यात अडकताक्षणीच मेल्याचं सोंग घेतलं. साहजिकच कोळ्यांनी मेलेला मासा म्हणून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिलं. दैववादी आणि इतर माशांना मात्र ते घेऊन गेले. म्हणूनच म्हणतात की संकट यायच्या आधीच तयार राहणारे, आणि संकट आल्यावर त्यातून सुटकेचा मार्ग शोधणारे सुरक्षित राहतात. सर्वकाही नशिबावर सोडून देणारे मात्र नष्ट होतात.

संकट येण्याआधीच सावधपणे त्यापासून बचाव करण्याची तयारी करणारा आणि संकट येताच सिद्ध राहून त्याच्यावर मात करू शकणारा...या दोघांना सूख मिळतं आणि त्यांचा विकास होतो. जे नशिबात असेल तेच होईल असा विचार करणारे दैववादी नष्ट होतात. 

एका तलावात विधाता, सिद्ध आणि दैववादी अशा नावांचे तीन मासे रहात होते. एके दिवशी काही कोळ्यांनी तो तलाव पाहिला, आणि त्यात खूप मासे आहेत हे पाहुन ते म्हणाले “उद्या आपण इथे मासेमारीसाठी येऊ!” हे ऐकून विधाताने सगळ्या माशांना बोलावलं आणि म्हणाला “त्या कोळ्यांचं बोलणं ऐकलंत? जिवंत राहायचं असेल तर आज रात्रीच आपल्याला जवळच्या दुसऱ्या तलावात जावं लागेल!’

विधाताचं म्हणणं ऐकून इतर मासे म्हणाले “आपलं घर सोडून आम्ही इतर कुठे नव्या जागेत जाऊ शकत नाही!” 

यावर सिद्ध म्हणाला “नव्या जागेत काही नव्याच अडचणी येऊ शकतात. आपण इथेच राहून कोळ्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न करायला हवा!”

दैववादी म्हणाला “जे नशिबात असेल ते होणारच. उगाच काहीही प्रयत्न करण्यात अर्थ नाही!”

विधाता त्याच्या कुटुंबाला घेऊन रात्रीच दुसऱ्या तलावात गेला.

दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी जाळं टाकलं. त्यात सिद्ध आणि दैववादीसह इतर मासे अडकले.

सिद्धाने जाळ्यात अडकताक्षणीच मेल्याचं सोंग घेतलं. साहजिकच कोळ्यांनी मेलेला मासा म्हणून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिलं. दैववादी आणि इतर माशांना मात्र ते घेऊन गेले.

म्हणूनच म्हणतात की संकट यायच्या आधीच तयार राहणारे, आणि संकट आल्यावर त्यातून सुटकेचा मार्ग शोधणारे सुरक्षित राहतात. सर्वकाही नशिबावर सोडून देणारे मात्र नष्ट होतात.