विसण घालणे



दाट अंधार सभोवताली आहे. दात वाजविणारी थ॔डी पडलेली आहे. घरातील सर्वजण, उबदार दुलईत गुुरफटून गाढ झोपलेले आहेत. इतक्यात आजीची हाळी ऐकू येते. "अरे ऊठा, मंगल, वैशाली ऊठ. दिवाळीच्या दिवशी तरी लवकर ऊठा." दिवाळीत घरोघरी विशेषतः नरकचतुर्थीच्या सकाळी हे हमखास घडते. मग कांही मंडळी आपण होऊन उठतात, तर कांहीना हलवून हलवून जागे करावे लागते. मुखमार्जनानंतर मग, ओवाळणे, मसाज करून सुगंधी तेल अंगात जिरवणे व घरी पाटा वरवंट्यावर  वाटलेल्या अथवा खलबत्त्यात कूटलेल्या व भिजलेल्या उटण्याने अंगावरील मळ साफ करण्याचा कार्यक्रम होतो.  जरा आठवून पहा, आपल्याही घरी थोड्याफार फरकाने हेच घडत असणार याची मला खात्री आहे. यानंतर येतो अभ्यंगस्नानाचा कार्यक्रम. कुडकुडत्या थंडीत कडकडीत तापलेले पाणी घंगाळात ओतल्या जाते. तितक्यात आजी किंवा आई  यातील कुणाचा तरी आवाज येतो. " अरे थांब पाण्यात विसण घालून देते " आता आली का पंचाईत. विसण घालणे म्हणजे काय? झाली ना दांडी गूल. अहो, मी जो शब्द वापलाय, त्याचा काळ आजचा नाही. सुमारे पन्नास - साठ वर्षाच्याही अगोदरचा आहे. त्यावेळचा, ज्यावेळी हिवाळ्यात थ॔डी पडायची. उन्हाळ्यात ऊन तापायचे. आणि पावसाळ्यात पाऊस पडायचा. ज्यावेळी शहरे सीमित होती व जास्तीत जास्त जनजीवन लहान गावांत विखुरले होते. ज्यावेळी पाटा-वरवंटा, खलबत्ता वापरला जायचा. ज्यावेळी चुलीवर स्वयंपाक केला जायचा व पाणी तापविले जायचे. विसण घालणे हा शब्द त्या काळचा आहे.  पाणी खूप गरम असेल तर अंगावर पाणी घेण्यासारखे  करण्यासाठी थंड पाणी त्यात मिसळण्याच्या कृतीस, विसण घालणे असे म्हणायचे. अंघोळीसाठी जवळच्या थंड पाण्याच्या हंड्यातून गडवा किंवा लोटीने पाणी घेऊन गरम पाण्यात मिसळत व सुमंगल अभ्यंगस्नानाचा आनंद घेत.  विसण घालणे हा शब्द आता परिस्थितीनुसार कालबाह्य झालेला आहे. शहरात वीज आली. वीजेवर चालणारी उपकरणे आलीत. घराघरात नळ आले. पाणी गरम करणारे गीझर आले. ठंड गरम पाणी योग्य प्रमाणात एकत्र करण्यासाठी मिक्सर आला. परिणामी हा शब्द शहर संस्कृतीतून हद्दपार झाला. ग्रामीण भागात वीज आल्यानंतर शहरी संस्कृतीच्या प्रभावाखालील ग्रामीण बोलीभाषेतूनही हा शब्द आपोआप वगळल्या गेला असावा. असे अनेक शब्द आहेत, जे आता वापरात नाहीत. असेही अनेक शब्द आहेत की, जे आता विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहेत. तर काही शब्द, बोजडतेमुळे अथवा पर्यायी सोपा शब्द मिळाल्यामुळे वापरात नाहीत. काही शब्द बदलेल्या परिस्थितीमुळे वापरात राहिले नाही. असे असले तरी जुने विस्मृतीत गेलेले शब्द, तत्कालीन समाजाच्या जीवन पध्दतीचे आकलन करून देत असल्याने, एक सांस्कृतिक  ठेवा असतो. या शब्दांना जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते, असे मला वाटते. येथे चुल, पाटा-वरवंटा, खल-बत्ता, घंगाळ, हंडा, गडवा व लोटी हे शब्द वस्तुंच्या स्वरूपाबाबत आहेत. त्यांची जपवणूक सहज होऊ शकते. पण विसण घालणे व कुटणे हे शब्द कृती दर्शवणारे आहेत. विसण घालणे या शब्दाबरोबर चुल, त्यांतील जळण म्हणून वापरले जायचे सरपण (लाकडे); या (जुन्या) वस्तु अप्रत्यक्षपणे जोडलेल्या आहेत. कुटणे हा शब्ददेखिल कार्यवाही शब्द आहे. असे शब्द व अनेक जुने अर्थवाही शब्द जाणीवपुर्वक जोपासण्याची गरज आहे.



किरण देशपांडे


नेरूळ, दि. ०७\०२\२०२२


9969871583.