विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य


कवी मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांना विदुषी दुर्गा भागवतांनी शब्दालंकार लेवऊन भाषेला कशी नटविली, सौंदर्यावती कशी बनविली याची झलक खाली देत आहे.


"फक्त ती काळी अक्षरे होती आणि ती वाचणारी मी होते. काही अक्षरे पंक्तीपंक्तीनी सजीव व सशब्द झाली होती. काही कुंचल्याचा आकार धारण करून रंगीत चित्रे रेखाटीत होती. काही हिरव्या, केशरी व निळ्या रंगाचे फवारे सोडीत बसली होती. काहींची काया नाहीशी होऊन 'मातीच्या अत्तराचा' ती भपकारा वर फेकीत होती. काही तेजस्वी ठिपके होऊन आकाशात उगीचच भिरभिरत होती. काही खूप खूप मोठी होऊन नदीप्रमाणे वहात होती. ढगाप्रमाणे गर्जत होती. आणि काही हट्टी पोरांप्रमाणे फुरंगटून कोपर्‍यात बसली होती."


ही झाली अक्षरांची विदुषी दुर्गा भागवतांनी यांनी रचलेली बाललीला. आता पुढे अक्षरांची शब्दफुले होऊन त्यांनी अर्थवाही, भाववाही स्वरूप धारण केल्यावर ॠचा रूपात अवतरलेल्या कवितेच्या अनुषंगाने त्या लिहितात :-



"सर्वांना गती देणारे संगीतही कुठून तरी ऐकू येत होते. परिचित, मृदू, मंजुळ असे. आणि मग त्या संगीताचे काय ते भान उरले. आणि मग थोडा अलिप्तपणा पत्करून मी त्या नादप्रतीतीचे पृथक्करण करू लागले. कवितेच्या पारंपरिक गेयतेपासून पाडगावकर कटाक्षाने दूर राहत असले तरीही पारंपरिक आणि नविन छंदांनी ही कविता निनादित आली आहे. ताल व नादाचे गतीमान व पार्थिवतेतून पुलकित झालेले सुकुमार सौंदर्य त्यांच्या शब्दाशब्दाने आत्मसात केले आहे. शब्दांनीच नव्हे तर अर्थानेही मूर्त अमूर्त अशा भाववृतींनीही. या कलात्मक सुसंवादामुळेच जी निसर्गप्रतीके पाडगावकरांनी वापरली आहेत, ती केवळ रंगानी भरलेली शब्दचित्रे वाटत नाहीत. ती गेयतेनी रसरसलेली नादबिंबे आहेत. ती गेयता झुळझळणा-या पाण्यात, भरकटणा-या वा-यात, रातकिड्यांनी नादविलेल्या रात्रीच्या काळोखात, पक्ष्यांच्या बोलात, फुलपाखराच्या विभ्रमात आणि अनंत सौंदर्यप्रतिमानात रात्रंदिवस विश्वगतीचे रूप घेऊन धावत असते; अचेतन सचेतन करते, सचेतन भावान्वित करते. तीच ही विशाल निरींद्रिय गेयता पाडगावकरांनी आपल्या काव्यात भरभरून ओतली आहे. बासरी वाजवणारा आपला श्वास बासरीत ओततो तशी. केवळ गतीचाच नाद व लय नव्हे, तर रंगाच्या सौंदर्यातला, प्रकाश छायेतला, वरवर पाहणारांना निःशब्द वाटणारा, पण कलावंताला जाणवणारा प्राणभूत सूक्ष्मतर नादही त्यांनी या गेयतेत कलाबूतासारखा पेरला आहे. त्यामुळे  पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन्ही अभिरूचींना रिझवू शकेल अशी घडण त्यांच्या कवितेला लाभली आहे. पाडगावकरांच्या कवितेचा 'गाणे' हा स्थायीभाव आहे. त्यांच्या कवितेच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण हे आहे.


संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा 

कुरळ्या लहरींमधुनी 

शीळ घालतो वारा 


या ओळीतील विलंबित तालाशी पहा; नाहीतर 


अफाटआकाश                  हिरवी धरती

पुनवेची रात   

सागर-भरती 

पाचूंची लकेर   

कुरणाच्या ओठी 

प्रकाशाचा गर्भ       

जलवंती पोटी 

अखंड नूतन मला ही धरित्री 

आनंदयात्री मी आनंदयात्री 


यातली द्रुतगती पहा, ते नादसौष्ठव पहा. हा गतीचा ध्यास, नादा-ताला ध्यास पाडगावकरांना निसर्गाचेदर्शन झाले आहे, जी निसर्गाची सृजन-प्रेरणा त्याच्या नसानसातून वाहतांना त्यांना भासते आहे तिच्या कलापुर्ण जाणिवेतून उत्पन्न झाली आहे."


जितके सुंदर काव्य, त्याची मनोवेधकता, तरलपणा, निसर्गसानिध्यता, निवडक अक्षर-शब्दांची पाखरण, नाद-लय-ताल-गती-वैविधता-सहजता तितकेच रुचीपूर्ण, शब्दलालित्य असलेलेली, काव्याचे मर्म उलगडणारी, मनोवेधक, मनोभावी, सहज व सुंदर काव्य समीक्षा विदुषी दुर्गा भागवत यांनी केलेली आहे. अशी विदुषी महाराष्ट्रात निपजली व साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात तळपली ही तमाम मराठीप्रेमींसाठी गौरवास्पद बाब आहे.


किरण देशपांडे. 

नेरूळ, नवी मुंबई. 

दिनांक २७\०१\२०२२. मोबाईल 9969871583.