सरदार निंबाळकर सकाळी शिबंदीची पाहणी करण्यास निघाले. आज त्यांनी पागोट्यावर लावलेला शिरपेच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिरपेचात लावलेला हिरा कोवळ्या सूर्यप्रकाशात लखलखत होता. त्याचेवर लावलेली सोन्याची कलगीचे प्रत्येक लहान लहान गोळे त्याच्या चालीमुळे हिंदकळत होते. त्यावरून परावर्तीत होणाऱ्या  प्रकाशकिरणांचा लपंडावाचा खेळ मनोवेधक होता व पाहणार्‍यांची प्रसन्नता वाढवीत होता. शिबंदीची तपासणी करून सरदार निंबाळकर परत गेले तरी त्यांच्या या हलगीची चर्चा सुरूच होती. हलगी साधारणपणे तुळशीच्या मंजिरीसारखी दिसते. 


सरदार गायकवाड यांनी दसर्‍याचा सण आनंदाने साजरा केला. संध्याकाळी शस्रपूजनासाठी त्यांनी पेहराव चढविला. सफेद र॔गाचा रेशमी अंगरखा त्यांनी परिधान केला होता. तशाच रंगाची अचकनही घातली होती. त्यांनी केसरी रंगाचे पागोटे घातले होते. त्यावरील शिरपेचात पिवळ्या रंगाचा तुरा लावला होता. वार्‍याच्या तालावर तो भुरभुरत होता. त्यामुळे सर्वाचे लक्ष तु-याकडे जात होते. असे तुरे आपणही बर्‍याच ठिकाणी पाहिले असावेत. आताही नवरदेवाच्या फेट्यावर कधी कधी असा तुरा लावलेला  आढळू शकतो. 


कलगी तुरा हे शब्द पगडी, फेटा वा पागोट्यावरिल शिरपेचात शोभा वाढविण्यासाठी लावायचे एक शिरोभुषण (वस्तू) आहे, हे येव्हांना आपल्या लक्षात आले असेलच. 


एका गावात सवाल जबाबाचा कार्यक्रम होता. पण हा कार्यक्रम धार्मिक होता. त्यामुळे श्रध्दावंतांची या कार्यक्रमाला खूप गर्दी केली. हिंदू समाजात शक्तीचे प्रतिक देवी स्वरूप मानले जाते. तर प्रकृती म्हणजे शीवाचे स्वरूप मानले जाते. त्यांच्या या गुह्य  स्वरूपाचे वर्णन सवालात कवनातून केले जाते, त्याला कवनातूनच जबाब देण्यात येते. धार्मिक स्वभावाचे प्रतिभासंपन्न कलाकार यात भाग घेतात. सवाल जबाब ऐकतांना भक्त रंगून जातात. शक्ती व प्रकृतीचे विविध स्वरूपाची गुह्य व कोणती दुस-या देवतेपेक्षा किती सामर्थ्यवान याची वर्णने त्यात असत. यातून या भक्तजनांचा एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असायचा.  आता हा प्रकार फारसा अस्तित्वात नाही. वास्तविक हे दोन संप्रदायांचे लोक असत. शक्ती संप्रदायाच्या भक्तांना नागेश तर प्रकृती (शीव) संप्रदायाच्या भक्तांना हरदास संबोधतात. शक्ती- नागेश पंथीयांना कलगी पंथीय तर शीव - हरदास पंथीयांना तुरेवाले पंथीय म्हटल्या जायचे. सवाल जबाबात या दोन संप्रदायातील श्रध्दावंत कलावंतात चढाओढ लागलेली असायची, ती केवळ आपल्या संप्रदायाचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी.


या शब्दांची ही पण एक अध्यामिक पार्श्र्वभूमी आहे.


तमाशाचा फड हा प्रकार तर सर्व परिचित आहे. हा लोकनृत्याचा प्रकार आहे. यातील शृंगारिक लावण्या तर गावातील लोकांचा अत्यंत आवडीचा विषय.  यांत दोन लावण्यवती कलावंतीणीमध्ये आपआपसात सवाल जबाब होत. एकीने दुसरीला कोडे घालायचे. त्याला दुसरीने जबाब देऊन कोडे सोडवायचे. नंतर तीने पहिलीला सवाल विचारचा व त्याला पहिलीने जबाब द्यायचा. मात्र हे सर्व करायचे ते गाण्यातून व नृत्यामधून. ही गाणी शृंगारिक स्वरूपातील असायची त्यामुळे अशा फडांना तुफान गर्दी व्हायची. या सवाल जबाबात एकमेकांवर जेते पद मिळविण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यासाठी आटापिटा केला जायचा. एकमेकावर मात करण्याचा उदिष्ट त्यांत असायचे. आपल्या लावणी पार्टीचा लौकिक वाढावा हा त्यामागचा उद्देश असायचा. मला वाटते सध्या याच अर्थाने हा शब्द जास्त प्रचलित आहे.


मूळ तुर्की असलेला हा शब्द आहे.  कलगी म्हणजे पागोटे व तुरा म्हणजे त्यावर लावलेले फूले, मोती वा इतर आभुषणे. आपल्याकडे हा शब्द फारसी भाषेतून आला. 


शब्दांची व्युपत्ती व नंतरचे त्या शब्दांचा कालोघात बदलेला अर्थ यांचा प्रवास फार मनोरंजक असतो नाही का?