आधण


"अग, मला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे आहे. आंघोळीसाठी आधण ठेवतेस काय ?" सुमारे तीसेक वर्षापुर्वी बहुतांश घरातून केंव्हाना केंव्हा अशी साद दिल्याचे ऐकू यायची. किंवा " अहो, चहासाठी आधण ठेवले आहे. या लवकर." अशी हाकोटी तर नेहमीच ऐकायला मिळायची. आताशा आधण हा शब्द कमी ऐकायला येतो. परवा मात्र हा शब्द ऐकला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुर्वी हा शब्द कसा वारंवार ऐकायला मिळायचा. त्यामुळे असेल की काय, या शब्दाच्या नेमक्या अर्थाचा फारसा विचार कुणी करीत नसावे. आताही असे बरेच शब्द आहेत की, ज्यांचा आपण फारसा विचार करीत नाही. बोलतांना कितीतरी शब्द आपण सहज बोलतो, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. कुणी तसा तो सांगितला तर त्या शब्दाच्या उत्पत्तीचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. तर परवा आधण शब्द ऐकला आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा याचा विचार सहज मनात डोकावला. मला बरेच दिवसांपासून शब्दांचे नेमके अर्थ शोधण्याची खोड लागली आहे.(आता खोड या शब्दाचाही नेमका अर्थ शोधावा लागेल). मराठीमध्ये संस्कृत, हिंदी, कानडी, मल्याळम्, फारसी, अरबी, अन्य बोलीभाषा अशा अनेक भाषांमधून शब्द आले आहेत. बरेचदा मुळ भाषेतील शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आपण मराठीत वापरतो. कांही वेळा त्याचे अपभ्रंशीत उच्चारण आपण करतो. काहीही असो! त्यामुळे भाषा मात्र समृध्द होत जाते यांस प्रत्यावाद नसावा. अरे हो, पण तुम्ही म्हणत असाल की, त्या आधण शब्दाचं पुढे काय झाले? तर आधण हा शब्द आला आहे हिंदीतून. दहन या शब्दापासून. अदहन म्हणजे ज्याचे दहन होत नाही. पाण्याचे आधण ठेवतात. पाणी अदहन आहे. त्याची वाफ होते पण ते नष्ट होत नाही. तर अशाप्रकारे आधण हा शब्द मराठीत वापरात आला. आता मला प्रश्न पडला आहे की, दहन शब्द आला कुठून? कृपया कुणी तरी सांगाल काय.


किरण देशपांडे

०३/०८/२०२१


संकल्पना आणि आवाज  - पौर्णिमा देशपांडे 


प्रस्तुती - मी Podcaster