'गर्जा महाराष्ट्र', 'तुझे देखके मेरी मधुबाला..' सारख्या रीमिक्स-कॉम्बो सॉंगनी आपली इंडस्ट्रीला ओळख करुन देत पुढे एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात म्युझिक इंडस्ट्रीत आपलं अढळ स्थान बनवणारा अवधूत गुप्ते आज महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक-संगीतकार बनला आहे. केवळ म्युझिक नाही तर दिग्दर्शक,निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र अशी ओळख इंडस्ट्रीत आहे. त्याच्या 'झेंडा','मोरया' सिनेमांना लोकांनी पसंती दिलीच, तर नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या 'बॉइज ३' नं देखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. अवधूतचं राजकारण आणि राजकीय नेत्यांसोबतही सलोख्याचं नातं आहे. सध्या भाजपानं आयोजित केलेल्या मराठी दांडियाची सूत्र अवधूतकडेच आहेत. यानिमित्तानंच ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत अवधूत गुप्तेनं राजकारण आणि मनोरंजन अशा दोन्ही विषयावर मनमोकळा संवाद साधला आहे.


