"तुझ्याकडे लंडनचा टोपोग्राफिकल नकाशा आहे का ग?" लोकमान्य टिळकांचा हा प्रश्न ऐकून काशीबाई कानिटकर एकदम चकीत झाल्या. त्या इंग्लंडला चालल्या होत्या आणि टिळक त्यांना तिथल्या रस्त्यांची माहिती देत होते. "इकडून उजवीकडे वळलं की अमुक रस्ता लागतो, तिकडून शॉर्टकट आहे..." हे ऐकून काशीबाई म्हणाल्या, "भाऊ, तुम्ही तर कधी लंडनला गेला नाहीत, मग तुम्हाला हे सगळं कसं माहित?" यावर टिळकांनी फक्त स्मितहास्य केलं. विचार करा, त्या काळी जेव्हा इंटरनेट नव्हतं, गुगल मॅप नव्हतं, तेव्हा हा माणूस पुण्यात बसून लंडनचा नकाशा डोक्यात फिट करून बसला होता! ही झाली भूगोलाची गोष्ट, पण टेक्नॉलॉजीमध्ये तर त्यांचा नादच करायचा नाही. केसरी वर्तमानपत्रासाठी त्यांनी एकदा २५ हजार रुपयांची—हो, त्या काळातले २५ हजार—एक नवीन प्रिंटिंग मशीन मागवली. मशीन आली खरी, पण ती जोडायची कशी हे तिथल्या इंजिनिअर्सना सुद्धा समजेना. त्यांची बत्ती गुल झाली! मशीनचे पार्टस् बघून सगळे डोक्याला हात लावून बसले. तेव्हा टिळक पुढे आले. त्यांनी त्या मशीनचं जाडजूड मॅन्युअल आणि पुस्तकं रात्रभर जागून वाचली. दुसऱ्या दिवशी त्यांनी चक्क त्या इंजिनिअर्सना हाताला धरून शिकवलं की "हा नट इथे बसवा आणि तो गियर तिथे जोडा." इंजिनिअरिंगची डिग्री नसतानाही केवळ वाचनाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी एक्सपर्ट लोकांना मार्गदर्शन केलं. याला म्हणतात परफेक्शन! कुठल्याही गोष्टीचा अर्धवट अभ्यास करायचा नाही. एकदा हातात विषय घेतला की त्याच्या मुळापर्यंत जायचं आणि समोरच्याला थक्क करायचं, ही टिळकांची 'रॉयल' स्टाईल होती!